जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
साडेतीन मुहुर्तापैकी एक व सोनेखरेदीसाठी शुभ दिवस समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोन्याच्या भावाने ३१ हजारांचा आकडा पार केला. आज, बुधवारी अक्षय्य तृतीया असल्याने सराफ बाजारात मोठी उलाढाल होणार असून सोन्याचा भाव आणखी वधारेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या सराफ बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात पावणेतीनशे रुपयांची वृद्धी झाली आणि दहा ग्रॅमसाठीचा सोन्याचा (स्टॅण्डर्ड) भाव ३१ हजार १५५ नोंदविला गेला. शुद्ध सोन्यासाठीचा भाव ३१ हजार ३०५वर पोहोचला. चांदीच्या भावातही मंगळवारी मोठी वाढ झाली. चांदीचा भाव प्रतिकिलो ३८ हजार ९४५वर पोहोचला.
अक्षय्य तृतीयेसाठीची संभाव्य मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव ३२ हजारांवर व चांदीचा भाव ४० हजारांपलीकडे पोहोचेल हा अंदाज मंगळवारी तरी फोल ठरला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमधील सराफ बाजारात सोन्याने ३२ हजारांचा टप्पा पार केल्याने ही शक्यता वर्तविण्यात आली होती. मंगळवारी जागतिक बाजारातही सोन्याचा भाव काहीसा स्थिरच होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.