अकोला: राज्याचं राजकारण सध्या अकोल्यामधून तापलं आहे. अकोला महानगरपालिकेच्या 80 जागांचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुमतासाठी 41 या जादूई आकड्याची गरज असताना भारतीय जनता पक्ष 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या साऱ्या गणितात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार ‘किंगमेकर’ ठरले असून, “ये तो बस शुरूवात है, असली पिक्चर अभी बाकी है,” असे सूचक विधान करून त्यांनी सत्तेचा सस्पेन्स वाढवला आहे.
भाजपचं ‘मिशन 41’: मित्रपक्षांच्या साथीने गड राखणार?
38 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी भाजपला बहुमतासाठी अजून 3 हातांची गरज आहे. सध्याच्या बेरीजीनुसार भाजपसोबत शिवसेना (1) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (1) मिळून 40 चे संख्याबळ जुळते. निर्णायक 41 वा आकडा गाठण्यासाठी भाजपची मदार आता अपक्ष आशिष पवित्रकार किंवा अकोला विकास समितीच्या एका नगरसेवकावर आहे. मात्र पवित्रकारांची नाराजी भाजपसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
‘बंडखोरी’ ते ‘किंगमेकर’;आशिष पवित्रकारांचा संघर्ष
माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे असलेल्या पवित्रकारांनी स्थानिक नेतृत्वावर थेट आरोप केले आहेत. स्थानिक आमदार रणधीर सावरकर आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी तिकीट नाकारल्याचा दावा करत त्यांनी वरिष्ठांच्या सूचनांनंतरही अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आता ते कोणाला साथ देतात, यावर महापालिकेचं भवितव्य ठरणार आहे.
काँग्रेसची ‘बेरीज’: विरोधकांची मोट बांधून चमत्कार?
काँग्रेस 21 जागांसह आघाडी बांधणीच्या प्रयत्नात आहे. शिवसेना (6), राष्ट्रवादी काँग्रेस (3), वंचित बहुजन आघाडी (5) आणि एआयएमआयएम (3) अशी बेरीज केल्यास आकडा 38 पर्यंत पोहोचतो. पवित्रकारांसह अपक्ष आणि अजित पवार गटाचा नगरसेवक मिळवण्यात यश आलं, तर अकोल्यात सत्ताबदलाची जादू ठरू शकते.
स्थानिक ‘ईगो’ भाजपला नडणार?
व्यक्तीद्वेष आणि गटबाजीची चर्चा जोरात आहे. काँग्रेसकडून पवित्रकारांना मोठ्या पदाची ऑफर असल्याचीही चर्चा आहे. पवित्रकारांनी भाजपची साथ सोडली, तर सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप विरोधी बाकावर बसू शकतो ही शक्यता आता नाकारता येत नाही.
अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांचे चित्र
एकूण 80 जागांसाठी झालेल्या या लढतीत बहुमताचा आकडा 41 असा आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 38 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले असून काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना (उबाठा) ला सहा, वंचित बहुजन आघाडीला पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि एआयएमआयएम यांनी प्रत्येकी तीन जागा जिंकल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर बाजी मारली असून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अशा स्थितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अकोल्याच्या या राजकीय महाभारतात ‘चाणक्यनीती’ कोणाची यशस्वी ठरणार आणि अखेर महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.