विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथे अवघ्या काही तासांच्या जिवंत नवजात बालिकेला उघड्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला जंगला तांडा शिवारात सोडून दिल्याचे समोर आले. बालिकेला त्यागण्याच्या उद्देशाने तिला उघड्यावर सोडून संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढल्याचा संशय आहे. हा प्रकार लक्षात येताच जंगला तांड्याच्या पोलीस पाटील संगीताबाई गोरख राठोड यांनी तातडीने फर्दापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, एवढ्या लहान बाळाला उघड्यावर सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस पाटील संगीताबाई राठोड यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.