एकीकडे श्रावण सोमवारला सुरुवात झाल्याने नाशिकमध्ये भाविकांमध्ये उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर हादरलं आहे. नाशिक शहरातील नाशिकरोड भागात असलेल्या गोसावी वाडी चौफुलीवर गोळीबाराची घटना घडली आहे.
या परिसरात पानटपरीसमोर उभ्या असलेल्या एका 32 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग करण्यात आल्याची बातमी समोर आल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पानटपरीसमोर उभा असलेला 32 वर्षीय सुमित पगारे याच्यावर जवळून दोन गोळ्या झाडण्यात आल्या, दोन्ही गोळ्या सुमीतच्या पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर जखमी झालेल्या सुमितला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, गोळीबार प्रकरणातील जखमी सुमित पगारे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोळीबार घडल्याची माहिती मिळताच शहरातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दखल झाले. तसेच घटनास्थळी हल्लेखोर आणि गोळीबारामागील कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. जुन्या वादातून गोळीबार झाला का? याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेने गोसावी वाडी परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.