मुंबई, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत दिली. महोत्सवाच्या तयारीकरीता समन्वय मंत्री, अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नाशिक येथे त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या आयोजनात कुठलीही कसर राहणार नाही. महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाला महाराष्ट्राची संस्कृती, लोककला याविषयीची नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नाशिक येथे १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यासाठी सुमारे लाखभर युवक – युवती उपस्थित राहण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.