मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून अकृषक कर वसुलीस शासनाची तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून अकृषक कर वसूल करू नये, यासाठी भाजपचे आमदार प्रयत्नशील होते. यासंबंधीची नोटीस पुन्हा बजावल्याने लादण्यात आलेली नोटीस व कारवाईला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, अतूल भातखळकर, योगेश सागर आणि अन्य आमदारांनी मंगळवारी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर आता मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांकडून अकृषक कर वसुलीस तात्पुरती स्थगिती दिली जात असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायटींचा अकृषिक कर माफ करावा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. तसेच मुंबई शहरातील सोसायट्यांना अकृषिक कर नसताना उपनगरातील सोसायटींना हा कर का? असा सवाल उपस्थित करत उपनगरातील सोसायटींनासुद्धा हा अकृषिक कर माफ व्हावा, असे शेलार म्हणाले होते.
मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसयटींचा अकृषिक करावर भाजप सरकारने बंदी घातली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने अकृषिक कर आकारण्यास पुन्हा सुरूवात केली. त्यामुळे हे कर त्वरित स्थगित करावे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.