एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही संबंधितांना निलंबित केले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कायद्याप्रमाणे पोलीस योग्य कारवाई करणार असा विश्वासही गृहमंत्री वळसे पाटलांनी व्यक्त केला आहे.
पोलीस बंदोबस्ताबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही. याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच या चौकशीत मिळालेली माहिती पोलीस न्यायालयात सादर करत आहेत. असे ते म्हणाले.
दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. तसेच फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं अशक्य असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे पवारांच्या घरावर केलेला हल्ला कर्मचाऱ्यांना महागात पडला आहे.
गुरुवारी ७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढत सुनावणी दिली होती. संपकाऱ्यांना आणखी एक संधी देऊन २२ एप्रिल पर्यंत सेवेत रुजू होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिल पर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निर्णयाबाबत गुरुवारी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जल्लोष साजरा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी ८ एप्रिल (शुक्रवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत आक्रमक स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान, हे रेकी आंदोलन असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.