Raihan Vadra Engagement : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे पुत्र रायहान वाड्रा यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. रायहानने आपली दीर्घकाळाची मैत्रीण अविवा बेग हिच्याशी साखरपुडा केला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोमवारी इंस्टाग्रामवर त्यांनी या विशेष सोहळ्याचे फोटो पोस्ट करत आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले.
रायहानने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोन फोटोंचा समावेश आहे. पहिल्या फोटोत हे जोडपे साखरपुड्यानंतर एकत्र दिसत असून, दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. या पोस्टला त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत “29.12.25” अशी साखरपुड्याची तारीख कॅप्शन म्हणून दिली आहे. या पोस्टवर सध्या मित्रमंडळी आणि समर्थकांकडून अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.
रायहान वाड्राची राजकारणापासून स्वतंत्र ओळख
रायहान वाड्राची ओळख केवळ राजकीय कुटुंबातील वारसदार म्हणून मर्यादित नाही, तर तो एक प्रस्थापित ‘व्हिज्युअल आर्टिस्ट’ आहे. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षांपासून त्याने कॅमेऱ्याशी मैत्री केली असून, वन्यजीव, स्ट्रीट आणि कमर्शियल फोटोग्राफीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 2021 मध्ये दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे त्याचे ‘डार्क परसेप्शन’ (Dark Perception) नावाचे पहिले एकल प्रदर्शन भरले होते, ज्याची कलाक्षेत्रात मोठी चर्चा झाली होती.
हेही वाचा – PIB Fact Check: 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? मोठी माहिती समोर
अविवाचे शिक्षण आणि कुटुंब
रायहानची होणारी पत्नी अविवा बेग देखील आपल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे स्थिर आहे. दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेची पदवी मिळवली आहे. व्यावसायिकदृष्ट्या इंटिरियर डिझायनर म्हणून काम करतात. त्यांना फोटोग्राफी आणि प्रोडक्शनमध्येही विशेष रस आहे. विशेष म्हणजे, अविवा या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू राहिली असून सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचीही मोठी आवड आहे.
अविवाचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास असून, तिचे वडील इम्रान बेग हे व्यावसायिक आहेत, तर आई नंदिता बेग या प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहेत. राजकारणापासून लांब राहून स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या रायहान आणि अविवा यांनी केलेल्या या नव्या सुरुवातीमुळे गांधी-वाड्रा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा – केंद्र सरकारची एलॉन मस्क यांच्या ‘X’ प्लॅटफॉर्मला नोटीस, ‘Grok AI’ चा गैरवापर, कोणत्या प्रकरणात कारवाई?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.