पुणे : एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश दिलीप देशमुख (वय 28 वर्ष) या तरुणाने पुण्यातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश हा मूळचा रा. खासापुरी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव येथील असून मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहत होता. मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 च्या दरम्यान तो रूमवर आला होता. त्यानंतर त्याने गळफास घेतल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रथमेशला वडील नव्हते, तर आई घरी एकटीच असते. त्याला चार बहिणी असून चौघींची लग्न झालेली आहेत. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचेही समोर आले आहे. प्रथमेशने युपीएससी आणि एमपीएससी अशा दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. परंतू एकही पूर्व परीक्षा पास होऊ शकला नाही. त्यामुळे तो परत गावी जाणार होता. सध्या त्याच्यावर 2.5 लाखापेक्षा जास्त कर्ज होतं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, जी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत आर्थिक अडचणी आणि त्याने ज्या व्यक्तींकडून पैसे घेतले होते, त्यांच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आता या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.