NTA High Tech Security: NEET-UG परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांनंतर वादग्रस्त ठरलेल्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (NTA) आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परीक्षांची गोपनीयता अबाधित राखणे आणि कोणत्याही स्तरावर डेटा लीक होण्यापासून रोखण्यासाठी NTA कडून तब्बल 7.5 कोटी रुपयांची नवीन सुरक्षा निविदा (tender) प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिल्लीतील मिंटो रोड येथील मुख्यालय, ओखला येथील प्रादेशिक कार्यालय, डेटाबेस सर्व्हर रूम्स, गोदामे आणि गोपनीय साहित्य ठेवल्या जाणाऱ्या 'स्ट्रॉन्ग रूम्स'ची 24 तास कडक राखण करण्याची जबाबदारी या नव्या हाय-टेक यंत्रणेवर असणार आहे.
हा करार सुरुवातीला 2 वर्षांसाठी असेल, ज्यामध्ये कामगिरी पाहून आणखी 2 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. निवडलेली व्यावसायिक एजन्सी केवळ साध्या सुरक्षेपुरती मर्यादित न राहता जीपीएस (GPS) गस्त, बायोमेट्रिक हजेरी, रिअल-टाइम रिपोर्टिंग सिस्टीम आणि अत्याधुनिक मेटल डिटेक्टर्स यांसारख्या हाय-टेक साधनांचा वापर करून प्रवेशद्वारांवर अत्यंत बारकाईने तपासणी करेल.
कंत्राटासाठी 'QCBS' मॉडेल: गुणवत्तेला प्राधान्य
सामान्यतः सरकारी कामांसाठी सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीला कंत्राट दिले जाते. परंतु, NTA ने यावेळी 'क्वालिटी-अँड-कॉस्ट बेस्ड सिलेक्शन' (QCBS) पद्धत स्वीकारली आहे.
या निविदेत भाग घेण्यासाठी संबंधित कंपनीकडे सुरक्षा क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव आणि गेल्या 3 वर्षांची वार्षिक उलाढाल किमान 10 कोटी रुपये असणे बंधनकारक आहे. तसेच मेट्रो, विमानतळ, केंद्रीय मंत्रालये किंवा मोठ्या विद्यापीठांमध्ये काम केलेल्या अनुभवी एजन्सींना यात प्राधान्य दिले जाईल. यासाठी कंपन्यांना 15 लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
CBI तपासात समोर आलेल्या बाबींनंतर NTA च्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी NTA ने सुमारे 60,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि 7.5 कोटींचा हा नवा सुरक्षा आराखडा तयार केला आहे. या अभेद्य सुरक्षेमुळे भविष्यातील परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि निष्पक्ष वातावरणात पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.