नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची चर्चा राजधानी दिल्लीत जोर धरत आहे. भाजपमधील संघटनात्मक बदलांनंतर आता मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्येही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करून हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.
16 ते 17 नव्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी
सूत्रांच्या माहितीनुसार, या विस्तारात सुमारे 16 ते 17 नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही विद्यमान मंत्र्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येऊ शकते. सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन, तीन किंवा चार मंत्रालयांची जबाबदारी असल्याने ती विभागून नव्या सदस्यांना संधी देण्याचा पर्यायही चर्चेत आहे.
नितीन गडकरींच्या खात्यात बदलाची चर्चा
या संभाव्य फेरबदलात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सध्याच्या मंत्रालयाऐवजी दुसरी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
पंतप्रधानांची 'चाय पे चर्चा' काय सांगते?
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध खासदारांशी स्वतंत्र संवाद साधत आहेत. या भेटींना राजकीयदृष्ट्या महत्त्व दिले जात असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नावांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्या राज्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
12 मंत्रिपदे अजूनही रिक्त
सध्या मोदी सरकारमध्ये एकूण 69 मंत्री कार्यरत आहेत, तर संविधानानुसार मंत्रिमंडळाची संख्या 81 पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच अजून 12 मंत्रिपदे रिक्त आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी सोडल्यानंतर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. नव्या विस्तारात हे खाते दुसऱ्या मंत्र्याकडे जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राला मिळणार का मोठी संधी?
या विस्तारात महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळेल किंवा कोणाच्या खात्यात बदल होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा भाग म्हणून प्रदेशनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो.
कधी होऊ शकतो विस्तार?
सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही राजकीय सूत्रांच्या मते, जन्माष्टमीच्या आसपास या विस्ताराची घोषणा होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय आणि भाजप नेतृत्वाकडूनच स्पष्ट होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.