IAS Tukaram Mundhe : आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा हाती घेऊन अवघा एक महिना पूर्ण झाला आहे. या अवघ्या 30 दिवसांच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये कायद्याचा असा काही वचक निर्माण केला आहे की राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे सुरक्षित अन्न आणि दर्जेदार औषधे मिळावीत, यासाठी मुंढे यांच्या नेतृत्वाखाली 25 मे ते 24 जून या काळात राज्यभर एक विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत दररोज वेगवेगळ्या भागात छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित व बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्यावरील कारवाईचा लेखाजोखा
राज्यात बेकायदेशीरपणे विकल्या जाणाऱ्या गुटखा आणि पानमसाला माफियांना तुकाराम मुंढे यांनी मोठा दणका दिला आहे. या विभागांतर्गत झालेली कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
– एकूण छापे: राज्यभरात तब्बल 904 ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
– जप्त मुद्देमाल: एकूण Rs 34.66 कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला.
– अटकेची कारवाई: या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या तब्बल 457 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
– सील आणि जप्ती: नियमबाह्यपणे चालणारी 322 आस्थापने (दुकाने/गोदामे) सील करण्यात आली असून, वाहतुकीसाठी वापरली जाणारी 42 वाहने जप्त केली आहेत.
– विभागनिहाय कामगिरी: या मोहिमेत सर्वाधिक अटक कोकण विभागात (156) झाली, तर सर्वाधिक किमतीचा माल नाशिक विभागात जप्त करण्यात आला.
22 लाख किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांना चाप लावण्यासाठी 'एफडीए'ने राज्यातील 440 अन्न आस्थापनांवर थेट छापे टाकले. या कारवाईदरम्यान प्रशासनाने तब्बल 22 लाख किलो वजनाचा असुरक्षित आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला, ज्याची बाजारपेठेतील एकूण किंमत 29.11 कोटी रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या या साठ्यामध्ये रासायनिक आंबे, बनावट दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, भेसळयुक्त चहा पावडर, खाद्यतेल, तूप, मसाले, आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट यांसारख्या रोजच्या वापरातील पदार्थांचा समावेश होता. या प्रकारात सर्वाधिक कारवाई पुणे विभागात झाली असून, त्याखालोखाल कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो.
औषध विभागाची मोठी कारवाई आणि एनडीपीएस गुन्हे
अन्नपदार्थांप्रमाणेच मानवी जीवनाशी थेट संबंधित असलेल्या औषध क्षेत्रातही मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये तब्बल 55 छापे टाकून प्रशासनाने 5.52 कोटी रुपये किमतीची विनापरवाना औषधे, बनावट कॉस्मेटिक्स, बनावट आयुर्वेदिक उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणी 9 एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय:
– जाहिरातींवर कारवाई: ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींवर 31 कारवाया करत 297 उत्पादनांवर गुन्हे दाखल केले.
– मिथेनॉल जप्ती: पुणे विषबाधा प्रकरणात तत्परता दाखवत 5,929 किलो मिथेनॉल जप्त केले आणि संबंधित पुरवठादाराचा परवाना कायमचा रद्द केला.
– वैद्यकीय उपकरणे: मुंबई, भिवंडी आणि पालघर परिसरात विनापरवाना ग्लोव्हज आणि वैद्यकीय उपकरणांवर छापे टाकून 2.17 कोटींपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त केला.
– विनापरवाना विक्री: विनापरवाना औषध उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून 2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
– अंमली पदार्थ: घातक ठरणाऱ्या ट्रामाडॉल कॅप्सूल आणि कोडीनयुक्त कफ सिरपचा साठा जप्त करून आरोपींवर थेट 'एनडीपीएस' (NDPS) कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.