आषाढी वारीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही पालखी यंदा 8 जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील मुक्कामाबाबत निर्माण झालेला संभ्रमही आता दूर झाला असून पालखीचा मुक्काम नेहमीप्रमाणे भवानी पेठेतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदाच्या वारीत पालखीचा आळंदी ते पंढरपूर असा प्रवास तब्बल 17 मुक्कामांत पूर्ण होणार आहे. या दरम्यान वारकऱ्यांना अनेक पारंपरिक धार्मिक सोहळ्यांचा अनुभव घेता येणार आहे. गोल रिंगण, उभे रिंगण, बंधू भेट यांसारखे भावनिक आणि भक्तिमय क्षण यंदाच्या वारीतही पाहायला मिळणार आहेत.
8 जुलैला पालखी आळंदीमधून प्रस्थान केल्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पुण्यात मुक्काम असेल. त्यानंतर पालखी सासवड, जेजुरी, वाल्हे या मार्गाने पुढे सरकेल. 15 जुलै रोजी पारंपरिक नीरा स्नानाचा कार्यक्रम पार पडणार असून पुढील मुक्काम लोणंद येथे असेल.
लोणंदनंतर चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. वारकऱ्यांसाठी हा क्षण विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पालखी तरडगाव, फलटण, बरड आणि नातेपुतेमार्गे पुढे जाणार आहे.
20 जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर माळशिरस येथे मुक्काम असणार आहे. पुढील दिवशी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल. ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे होणारी बंधू भेट हा देखील वारीतील महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो.
23 जुलैला बाजीराव विहीर परिसरात गोल आणि उभे रिंगण पार पडून पालखी वाखरी येथे दाखल होईल. त्यानंतर 24 जुलै रोजी सर्व संतांच्या पालख्यांसह माउलींची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पायी वारी करणार आहेत. भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची पुन्हा एकदा साक्ष देणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.