Badshah Controversy: बादशाहच्या ‘टटीरी’ गाण्याने वाद पेटला; महिला आयोग संतापला, थेट अटकेची मागणी

रॅपर बादशाहच्या ‘टटीरी’ गाण्यावरून वाद निर्माण झाला असून हरियाणा महिला आयोगाने त्याच्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.
Badshah Controversy: बादशाहच्या ‘टटीरी’ गाण्याने वाद पेटला; महिला आयोग संतापला, थेट अटकेची मागणी

Badshah Controversy: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहच्या ‘टटीरी’ या गाण्यावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. या गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांमुळे महिलांबाबत आक्षेपार्ह संदेश दिला गेल्याचा आरोप करत हरियाणा राज्य महिला आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने बादशाहला अटक करण्याची मागणी केली असून संबंधित पोलिसांना त्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, या वादाच्या पार्श्वभूमीवर बादशाहने देशात कुठेही कॉन्सर्ट किंवा सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत. यासाठी संबंधित प्रशासन आणि आयोजकांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा: Soha Ali Khan : इनायाने बनवले घरासाठी 'कडक शिस्ती'चे नियम! आई सोहाने शेअर केली मजेशीर यादी

याशिवाय बादशाह देशाबाहेर जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही आयोगाने केली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर कडक नजर ठेवण्याची गरज असल्याचे आयोगाचे मत आहे.

दरम्यान, महिला आयोगाने या प्रकरणात बादशाहला समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तो ठरलेल्या वेळी आयोगासमोर हजर राहिला नाही. त्याऐवजी त्याचे वकील उपस्थित राहून बादशाह कामानिमित्त व्यस्त असल्याने सध्या उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आणि अतिरिक्त वेळ मागितला. आयोगाने त्यांना काही वेळ दिला होता, मात्र त्यानंतरही बादशाह हजर न राहिल्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.

महिला आयोगाच्या मते, ‘टटीरी’ या गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांमुळे महिलांबाबत चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे समाजात नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे आयोगाने म्हटले आहे. या कारणामुळेच आयोगाने आधी नोटीस पाठवून बादशाहला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा: Anil Kapoor: पाच लाख पाउंड्सची रॉयल्टी! चित्रपट केला फ्रीमध्ये, तरीही 17 वर्षांनंतर अनिल कपूर यांना मिळतोय लाखोंचा चेक

या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर काही सामाजिक संघटना आणि महिला संघटनांनी त्याविरोधात आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हे गाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बादशाहने एक व्हिडिओ संदेश शेअर केला. त्यामध्ये त्याने सांगितले की, “माझ्या गाण्यातील काही शब्दांमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल खेद आहे.” तसेच स्वतः हरियाणाशी संबंधित असल्याने कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असेही त्याने स्पष्ट केले. या वादामुळे बादशाहच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version