एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी खुलाताबाद येथील दर्गेला भेट देत दर्शन घेतले. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचेही दर्शन घेतले. यावेळी एमआयमचे नेते इम्तियाज जलील, वारिस पठाणही उपस्थित होते. मात्र, औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी दुपारी खुलाताबाद येथील हजरत सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जाऊन दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्गेत गेल्यानंतर अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीस्थळी पोहचले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी अनेक दर्गांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत इम्तीयाज जलील, वारीस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मात्र, अकबरुद्दीन ओवैसी यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला असून औरंगजेबाच्या कबरीचे ओवैसी यांनी दर्शन घेतले. त्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे. याप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, आजपर्यंत औरंगजेबाच्या कबरीचे कोणीच दर्शन घेतले नाही. मात्र, एमआयएम नेत्यांनी दर्शन घेऊन नव्या पद्धतीने राजकारण सुरू करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप चंद्रकांत खैर यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.