SET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. SET परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक तिसऱ्यांदा बदलल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी घेतली जाणारी 41 वी SET परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि आयोजनातील सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 'सेट' परीक्षा 26 जुलै रोजी होणार होती. मात्र, एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलून 6 सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सीटेट होणार असल्याने पुन्हा परीक्षेची तारीख बदलून 20 सप्टेंबर करण्यात आली होती. पण आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
20 सप्टेंबरच्या आसपास केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी); तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षेची तारीख बदलण्याबाबत पुणे विद्यापीठाकडे निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनानंतर ही परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि आयोजनातील सोयीचा विचार करून परीक्षा 25 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.