Instagram Data Leak: इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; तब्बल 1 कोटी 75 लाख इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक; तुमचं अकाउंट वाचवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

सायबरसुरक्षा कंपनीच्या अहवालानुसार सुमारे 1 कोटी 75 लाख इंस्टाग्राम वापरकर्त्यांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे फसवणूक आणि ओळख चोरीचा धोका वाढला आहे.
Instagram Data Leak: इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा; तब्बल 1 कोटी 75 लाख इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक; तुमचं अकाउंट वाचवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

Instagram Data Leak: सोशल मीडियाचा वापर वाढत असतानाच सायबर सुरक्षेचे धोकेही गंभीर होत चालले आहेत. अशातच इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 1 कोटी 75 लाख इंस्टाग्राम युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याची माहिती सायबरसुरक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मालवेअरबाइट्सने दिली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मालवेअरबाइट्सच्या माहितीनुसार, हॅकर फोरमवर मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वापरकर्त्यांचा डेटा उपलब्ध असल्याचं आढळून आलं आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये युजरनेम, संपूर्ण नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्त्याचे काही तपशील तसेच संपर्काशी संबंधित इतर माहितीचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, हा डेटा थेट अकाउंट हॅक करून नव्हे तर मोठ्या प्रमाणावर प्रोफाइल स्क्रॅपिंगद्वारे गोळा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा डेटा चुकीच्या लोकांच्या हाती गेला तर त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते. ओळख चोरी, फिशिंग ईमेल्स, बनावट कॉल्स किंवा खोट्या लिंकद्वारे वापरकर्त्यांची फसवणूक केली जाऊ शकते. अनेक वेळा हॅकर्स इंस्टाग्रामच्या पासवर्ड रीसेट प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन अकाउंटवर ताबा मिळवतात, असंही तज्ज्ञ सांगतात.

हा डेटा लीक झाल्याचा प्रकार मालवेअरबाइट्सच्या डार्क वेब मॉनिटरिंगदरम्यान उघडकीस आला. मात्र, इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुष्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका हा डेटा कसा लीक झाला आणि कोणत्या कालावधीत ही माहिती बाहेर गेली, याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

दरम्यान, वापरकर्त्यांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञ देत आहेत. जर इंस्टाग्रामकडून कोणताही संशयास्पद ईमेल, पासवर्ड बदलाची सूचना किंवा अनोळखी लॉगिन अलर्ट मिळत असेल, तर त्वरित त्याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिकृत सुरक्षा ईमेलद्वारेच आलेल्या सूचनांवर विश्वास ठेवावा आणि इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

तुम्ही अजूनही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकत असाल, तर लगेच पासवर्ड बदला, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा आणि अकाउंटला जोडलेले ईमेल व मोबाईल नंबर तपासा. तसेच, कोणतेही संशयास्पद थर्ड-पार्टी ॲप्स अकाउंटशी जोडलेले असतील तर त्यांचा ॲक्सेस काढून टाकावा.

एकूणच, हा डेटा लीक प्रकार सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी मोठा इशारा आहे. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी केवळ प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहता स्वतःही आवश्यक ती काळजी घेणं आता अत्यंत गरजेचं ठरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version