मुंबई: देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पासच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( National Highways Authority of India, NHAI) या पासच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नव्या आर्थिक वर्षापासून वाहनचालकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे.
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 3,000 रुपये असलेला वार्षिक टोल पास 1 एप्रिल 2026 पासून 3,075 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही नवीन दररचना आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू राहणार आहे. हा पास मुख्यतः खासगी म्हणजेच नॉन-कमर्शियल वाहनांसाठी उपलब्ध असून संबंधित वाहनावर वैध आणि सक्रिय फास्टटॅग असणे अनिवार्य आहे.
या वार्षिक पासच्या वापरासंदर्भातही ठराविक नियम लागू आहेत. 3,075 रुपयांचा हा पास एक वर्षासाठी किंवा 200 वेळा टोल प्लाझा पार करेपर्यंत वैध राहणार आहे. यामध्ये जे आधी पूर्ण होईल त्यानुसार पासची वैधता संपेल. उदाहरणार्थ, एखाद्या वाहनाने 200 वेळा टोल प्लाझा पार केले तर पासची मुदत त्या क्षणी संपेल, जरी त्याचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला नसेल.
या निर्णयाबाबत NHAI ने देशभरातील सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू करावेत आणि त्याबाबत प्रवासी तसेच संबंधित हितधारकांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना नवीन शुल्काची पूर्वकल्पना मिळेल.
सरकारच्या धोरणानुसार टोल शुल्क आणि संबंधित दरांचा दरवर्षी आढावा घेतला जातो. त्यानुसार परिस्थितीनुसार सुधारणा किंवा बदल केले जातात. याच प्रक्रियेचा भाग म्हणून यंदा वार्षिक टोल पासच्या शुल्कात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खर्चात थोडी वाढ होणार असली तरी ही वाढ मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.