Hindu Muslim Love Story : जेलमध्ये सूत जुळलं! महिला जेलर खुनी गुन्हेगार कैद्याच्या प्रेमात; धर्माच्या भिंती तोडून चढली बोहल्यावर

कारागृहात ड्युटी दरम्यान सुरू झालेल्या या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीचा शेवट छत्तरपूरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार झालेल्या विवाहाने झाला.
Hindu Muslim Love Story : जेलमध्ये सूत जुळलं! महिला जेलर खुनी गुन्हेगार कैद्याच्या प्रेमात; धर्माच्या भिंती तोडून चढली बोहल्यावर

मध्य प्रदेश: प्रेमाला सीमा नसते आणि धर्माची बंधनेही नसतात, याची प्रचिती देणारी एक अनोखी घटना मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधून समोर आली आहे. सातना मध्यवर्ती कारागृहात तैनात असलेल्या एका मुस्लीम महिला जेलर यांनी, खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका हिंदू व्यक्तीशी विवाह केला आहे. 5 मे 2026 रोजी छत्तरपूरमधील लवकुशनगर येथील एका मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार आणि वैदिक मंत्रोच्चारात लग्नगाठ बांधली असून, सध्या या लग्नाची संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

कारागृहातील ड्युटी अन् प्रेमाची सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोझा खातून या मूळच्या रेवा येथील रहिवासी असून त्या सातना मध्यवर्ती कारागृहात सहाय्यक जेल अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ड्युटी दरम्यान त्यांचा संपर्क धर्मेंद्र सिंह या कैद्याशी आला. फिरोझा या कारागृहात वॉरंट प्रभारी म्हणून काम पाहत होत्या, तर धर्मेंद्र कारागृहातील वॉरंटशी संबंधित कामात त्यांना मदत करत असे. कामाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठींतून त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले.

जन्मठेपेची शिक्षा अन् सुटका

धर्मेंद्र सिंह हा चंदला येथील रहिवासी असून त्याला 2007 मध्ये चंदला नगर परिषदेचे उपाध्यक्ष कृष्ण दत्त दीक्षित यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तब्बल 14 वर्षे कारागृहात घालवल्यानंतर, त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची सुटका करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून धर्मेंद्र बाहेर त्याचे सामान्य जीवन जगत होता. मात्र, कारागृहात असताना सुरू झालेली ही प्रेम कहाणी बाहेर आल्यावरही संपली नाही, तर ती लग्नाच्या वळणापर्यंत पोहोचली.

हेही वाचा: Nashik Crime News: माणुसकीला काळिमा! 25 लाख दिले, 21 तोळे सोनंही दिलं; तरी सासरच्यांची हाव संपेना; शेवटी छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

कुटुंबाची पाठ, बजरंग दलाने निभावली भूमिका

या आंतरधर्मीय विवाहासाठी फिरोझा खातून यांच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला आणि लग्नाला उपस्थित राहण्याचे टाळले. अशा कठीण प्रसंगी वधूच्या बाजूने कोणीही नातेवाईक नसल्याने, स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येत मदतीचा हात दिला. या कार्यकर्त्यांनीच फिरोझा यांचे 'कन्यादान' केले आणि हिंदू परंपरेनुसार सर्व विधी पूर्ण करण्यास मदत केली. सामाजिक आणि धार्मिक मतभेद बाजूला सारून या जोडप्याने एकत्र राहण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव अन् चर्चेचा विषय

फिरोझा आणि धर्मेंद्र यांचा हा विवाह सध्या संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोक या विवाहाकडे जातीय सलोखा, बंधुभाव आणि माणुसकीचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहत आहेत. कायद्याचे रक्षण करणारी एक अधिकारी आणि कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आलेला एक व्यक्ती जेव्हा प्रेमाखातर एकत्र येतात, तेव्हा ती केवळ एक प्रेम कहाणी न राहता समाजासाठी एक वेगळा संदेश ठरते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Ahilyanagar Crime : हुंड्यासाठी 23 वर्षीय विवाहितेचा छळ; विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version