Tiger Deaths : धक्कादायक! केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे एका आठवड्यात 5 वाघांचा मृत्यू; वनविभाग अलर्ट मोडवर, करणार ‘हा’ उपाय

जंगलातील प्राण्यांची विष्ठा आणि पाणवठ्यांचे सॅम्पलिंग करणे सध्या अनिवार्य झाले आहे. पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होऊ नये आणि वन्यजीवांचे रक्षण व्हावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
Tiger Deaths : धक्कादायक! केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे एका आठवड्यात 5 वाघांचा मृत्यू; वनविभाग अलर्ट मोडवर, करणार ‘हा’ उपाय

Canine Distemper Virus Tiger Deaths in MP : मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध 'कान्हा व्याघ्र प्रकल्पात' वाघांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ एका आठवड्यात, म्हणजे 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान, टी-141 ही वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जबलपूर येथील 'स्कूल ऑफ वर्ल्ड लाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ' प्रयोगशाळेने या मृत्यूंची तपासणी केली असता, या 5 ही वाघांचा बळी 'केनाईन डिस्टेंपर वायरस' (CDV) मुळे गेल्याचे निष्पन्न झाले आहे. हा विषाणू कुत्र्यांमध्ये आढळतो आणि त्यांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. मुळात कुत्रा वर्गीय प्राण्यांचा (Canine) असलेला हा आजार आता मांजर वर्गीय (Feline) प्राण्यांमध्ये, विशेषतः वाघ आणि बिबट्यांमध्ये वेगाने पसरत असल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कुत्र्यांपासून वाघांपर्यंत संसर्गाचा प्रवास
हा विषाणू वाघांपर्यंत पोहोचण्यामागे अनेक कारणे असू शकतात. 
1. वाघ किंवा बिबट्याने शिकार केल्यानंतर अनेक वेळेला ती अर्धवट खाऊन ते सोडून देतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे येऊन ती खातात. यादरम्यानच्या काळात वनक्षेत्राच्या आसपासच्या गावातील कुत्र्यांनी ती शिकार खाल्ली असता त्यांच्यातील विषाणू लाळेतून मांसापर्यंत पोहोचतो. त्यामुळे मृत शिकारीच्या मांसाच्या माध्यमातून विषाणू संक्रमण वाघ आणि बिबट पर्यंत पोहोचत आहे.
2. तसेच जंगलातील सामायिक पाणवठ्यांवरील पाणी प्यायल्याने किंवा संक्रमित कुत्र्याची शिकार केल्यानेही हा प्रसार होतो.

कुत्र्यांमध्ये हा आजार केवळ श्वसनाचे विकार निर्माण करतो, परंतु वाघ किंवा बिबट्यांमध्ये तो थेट मज्जासंस्थेवर (Neurological system) हल्ला करतो. यामुळे वन्य प्राणी आपली नैसर्गिक प्रवृत्ती विसरू शकतात आणि ते अधिक अशक्त होऊन मृत्यूमुखी पडतात.

हेही वाचा – Shooters Arrested: गँगस्टर हाशिम बाबा टोळीला मोठा दणका! क्राईम ब्रांचने 'या' 6 खतरनाक शूटर्सना ठोकल्या बेड्या

वन विभागाचा 'नो गो झोन' आणि हाय अलर्ट
या घटनेनंतर कान्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून ज्या 'सरही' सेक्टरमध्ये हे मृत्यू झाले, तिथे 5 चौरस किलोमीटरचा भाग 'नो गो झोन' म्हणून घोषित केला आहे. इतर वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी 40 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून हत्तीवरून गस्त घातली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या 80 गावांमधील कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वाघ आणि बिबट्यांचे थेट लसीकरण करणे अत्यंत कठीण असल्याने, या संसर्गाचा मूळ स्रोत असलेल्या कुत्र्यांमधील आजारावर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रातील पेंच आणि ताडोबावरही संकट
कान्हामधील या भीषण परिस्थितीचा परिणाम शेजारील महाराष्ट्र राज्यावरही होण्याची दाट शक्यता आहे. मध्यप्रदेशात झालेल्या या आजाराच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मोठा धोका निर्माण झाला आहे. जंगलातील प्राण्यांची विष्ठा आणि पाणवठ्यांचे सॅम्पलिंग करणे सध्या अनिवार्य झाले आहे. पर्यटनावर याचा विपरीत परिणाम होऊ नये आणि वन्यजीवांचे रक्षण व्हावे, यासाठी दोन्ही राज्यांचे वन विभाग आता हाय अलर्टवर आहेत.

हेही वाचा – National Technology Day 2026 : भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात उंच भरारी! पोखरण परमाणू परीक्षणामुळे मिळाली जागतिक पातळीवर नवी ओखळ; जाणून घ्या पोखरण 2 चा 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना'शी थेट संबंध

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version