Train Accident: चूक एकाची, बळी पाच जणांचा! रेल्वेमधून खाली उतरणे पडले महागात; पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या धडकेत पाच प्रवाशांचा जागीच अंत

या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Train Accident: चूक एकाची, बळी पाच जणांचा! रेल्वेमधून खाली उतरणे पडले महागात; पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या धडकेत पाच प्रवाशांचा जागीच अंत

उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या यमुनापार भागात काल बुधवारी 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघात झाला. करछना-भीरपूर रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नेता जी एक्सप्रेसचे लोको पायलट आणि गार्ड यांनी डाउन लाईनवर रेल्वे रुळांवर आधीपासून एक मृतदेह पडलेला पाहिला. त्यानंतर त्यांनी तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. ट्रेन अचानक थांबल्यामुळे काही प्रवासी जनरल डब्यातून खाली उतरले आणि शेजारच्या ट्रॅकवर उभे राहिले.

याचवेळी समोरून पुरुषोत्तम एक्सप्रेस वेगाने येत होती. ट्रॅकवर उभे असलेल्या प्रवाशांना वेळेत बाजूला होता आले नाही आणि त्यांना ट्रेनची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रेल्वे रुळांवर भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: Rishabh Pant Injured: लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का! कर्णधार ऋषभ पंत जखमी, कोपराच्या दुखापतीमुळे सोडलं मैदान

उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, नेता जी एक्सप्रेस सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आली होती. त्यानंतर सुमारे 6 वाजून 47 मिनिटांनी पुरुषोत्तम एक्सप्रेस त्या ठिकाणावरून गेली आणि हा अपघात घडला. सध्या रेल्वे प्रशासन, जीआरपी आणि आरपीएफकडून संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांच्या जवळ सापडलेल्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतांसोबत प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही चौकशी केली जात आहे. तसेच रुळांवर आधीपासून पडलेला मृतदेह नेमका कसा आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा: LPG Gas Supply: गॅस सिलिंडरच्या किमती भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतावर LPG टंचाईचे मोठे संकट; तब्बल 3 ते 4 वर्षे पुरवठा विस्कळीत राहण्याची भीती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version