PNB Scam: पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात फरार उद्योगपती मेहुल चोक्सीविरुद्ध मोठी कारवाई झाली आहे. मुंबई येथील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या 46 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे. या मालमत्तांमध्ये मुंबईतील बोरिवलीतील चार फ्लॅट्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) डायमंड बोर्समधील ऑफिस, गोरेगाव येथील औद्योगिक युनिट्स, तसेच जयपूर SEZ मधील दागिने तयार करण्याची यंत्रसामग्री आणि चांदीच्या विटा यांचा समावेश आहे.
हेही वाचा –Viral Video: "भैय्या, मत करो प्लिज… " रॅपिडो ड्रायव्हरचं महिलेसोबत लज्जास्पद कृत्य; व्हिडिओ व्हायरल
या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटर शंतनू रे यांच्या देखरेखीखाली केली जाईल. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील या लिलावावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लिलावातून मिळणारी रक्कम ICICI बँकेत न्यायालयाच्या नावे मुदत ठेवीत ठेवली जाईल.
दरम्यान, 2018 मध्ये उघड झालेल्या या 23,000 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी अजूनही फरार आहे, त्याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. या आदेशामुळे चोक्सीविरुद्धच्या लिक्विडेशन आणि चौकशी प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.