Ranpati Shivray Swari Agra: छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमांची, तल्लख बुद्धिमत्तेची आणि गनिमी कावा युक्त रणनीतीची झलक देणारा भव्य चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्दर्शक-दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ संकल्पनेअंतर्गत सहावे पुष्प म्हणून सादर होणाऱ्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक मुत्सद्दी योद्धे होते, ज्यांनी आपल्या स्वराज्याच्या उभारणीत पराक्रमासोबत बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट वापर केला. मुघल साम्राज्याच्या बलाढ्य औरंगजेबावर त्यांनी फक्त जोरदार धक्का दिला नाही, तर दरबारात जाण्याची धाडस दाखवत त्याला थरारक आव्हानही दिले. या टिझरमध्ये महाराजांनी घेतलेली मोठी जोखीम, औरंगजेबाच्या दरबारातील प्रसंग आणि गनिमी कावा वापरून केलेला शत्रूचा पराभव प्रेक्षकांना रोमांचकरीत्या अनुभवायला मिळतो.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या संयुक्त निर्मितीत हे भव्य प्रोजेक्ट साकारले आहे. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार, मुरलीधर छतवानी असून सहनिर्माते रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा आहेत. दिग्दर्शकांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कठीण परिस्थितीतही हार मानली नाही; त्यांच्या धैर्याची, शौर्याची आणि रणनीतीची आठवण करून देणारा हा प्रेरणादायी इतिहास आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.
हेही वाचा – Filmfare OTT Awards: फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स जाहीर; कोण ठरलं पुरस्कारचं मानकरी, पहा संपूर्ण विजेत्यांची यादी
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची प्रदर्शनी शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी होणार असून, पॅनोरमा स्टुडिओज याचे वितरण जागतिक पातळीवर (वर्ल्डवाइड) केले जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.