मुंबई: गेली 91 वर्षे संगीत आणि साहित्याचा वारसा जपणारी संस्था "मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव" यांच्या तर्फे डॉ. अ. ना. भालेराव यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा केला जातो. त्या अंतर्गत या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघ (नाट्य शाखा) आयोजित ‘नाट्यसेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ’ बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ , संध्याकाळी ५:०० वाजता. मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव, येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी यांच्या हस्ते नाट्यक्षेत्रातील विविध विभागांतील मानकऱ्यांचा 'नाट्यसेवा गौरव पुरस्कार' देऊन पुढील कलाकारांचा गौरव करण्यात आला.
श्री.अशोक समेळ (श्रीमती विद्या फडके पुरस्कृत अभिनया साठी गद्यकलावंत.)
श्री.अजिंक्य पोंक्षे (डॉ.श्रीरंग आडारकर पुरस्कृत संगीत कलाकार.)
सौ.डॉ.केतकी चैतन्य (डॉ.विजया भालेराव पुरस्कृत संगीत स्त्री अभिनेत्रीस.)
श्री.प्रसाद पाध्ये. (श्री.लक्ष्मण त्रिलोकेकर पुरस्कृत वादक कलाकार.)
श्री.नरेश पाते . (श्री नारायण त्रिलोकेकर पुरस्कृत रंगमंच कामगार.)
श्री.मंगेश सातपुते. (श्री.लालबंद शेठ पुरस्कृत नाट्यदिग्दर्शक.)
श्री.संजय तोडणकर. (श्री.अजित फडके पुरस्कृत प्रकाश योजनाकार.)
श्रीमती शुभांगी दामले.महाराष्ट्र कल्चरल,पुणे.(डॉ.रा.अ.भालेराव पुरस्कृत निर्मिती संस्था.)
श्री.विलास पागार.(कै.बापूराव पेंढारकर स्मृती समिती पुरस्कृत प्रायोगिक रंगभूमी संस्था.)
श्री. विलास कर्वे.(श्री.य.वि.भातखंडे पुरस्कृतडॉ. अ.ना.भालेराव स्मुर्ती प्रित्यर्थ संगीत नाटककार)
शर्मिला राजाराम शिंदे (श्रीमती रजनी जोशी पुरस्कृत सुहासिनी मुळगावकर पारितोषिक साहाय्यक अभिनेत्री.)
श्री. राजीव जोशी (लेखन ) ,आणि प्रमोद निवळे (रंगमंच कामगार) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पारितोषिक मानकर्यांची निवड श्री. विजय केंकरे, डॉ. अनिल बांदिवडेकर, श्री. चंद्रशेखर गोखले , श्री. राजीव जोशी, प्राध्यापक ,डॉ. मिलिंद जोग, श्री ज्ञानेश पेंढारकर यांच्या समितीने केली होती
तसेच १०१ व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी यांची निवड झाल्या मुळे त्यांचा विशेष सन्मान मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष श्री . विजय केंकरे आणि कार्याध्यक्ष सौ. उज्वलाताई मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आला. साहित्य संघाच्या वाटचाली बद्दलचा आढावा कार्याध्यक्ष सौ. उज्वलाताई मेहेंदळे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला घेतला . तर श्री.मोहन जोशी यांच्या सत्कारा नंतर श्री.विजय केंकरे यांनी श्री. मोहन जोशीन बद्दल केलेले भाषण आणि सत्काराला उत्तर म्हणून . मोहन जोशी यांचे भाषण टाळ्या ,हशे आणि प्रेक्षकांची दाद घेऊन गेले. या सोहळ्याची सांगता डॉ.अश्विनी भालेराव,गांधी ( प्रमुख कार्यवाह ) यांनी सर्वांचे आभार मानून केली. या सोहळ्याच्या निवेदनाची बाजू श्री. राजीव जोशी, आणि सौ. माधुरी जोग यांनी सांभाळली होती.
पुरस्कार सोहळ्यानंतर रसिकांसाठी खास काही नाट्यपदे व नाट्यप्रवेश,भावगीत अशा स्वरूपाचा ‘स्मरणगाथा’ हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला . चालू किंवा गेल्या वर्षी ज्या रंगभूमीवरील कलाकारांचे, लेखकांचे व संगीतकारांचे जन्मशताब्दी वर्ष होते, त्यांना अभिवादन करून त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले . कार्यक्रमाची संकल्पना: ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर (नाट्य शाखा प्रमुख) यांची होती. सहभागी कलाकार डॉ.केतकी चैतन्य, श्री. ओंकार प्रभुघाटे, श्री. अजिंक्य पोंक्षे, श्री.ज्ञानेश पेंढारकर या सर्व कलाकारांनी आपल्या गाण्याने, अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्याचे रुपातर वन्स मोर मध्ये झाले होते. श्री.मोहन जोशी यांनी खास आग्रहास्तव संथ वाहते कृष्णा माई हे गीत सादर केले. तर श्री. विजय गोखले यांनी एकच प्याला मधील प्रवेश आणि कै.बाळासाहेब कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील कविता ,वाक्य , आणि बाळा साहेब यांच्या आठवणी सांगून बहार आणली. या कार्यक्रमाचे निवेदन श्री . विग्नेश जोशी यांचे नेहेमी प्रमाणे माहिती पूर्ण, हसत खेळत, प्रेक्षकांशी संवाद साधत केले होते. एकच प्याला ,दुरितांचे तीमिर जावो या नाटकातील प्रवेशात त्यांचा सहभाग ही होता . श्री.महेश खानोलकर (व्हायोलीन), श्री.वरद सोहनी(ऑर्गेन), श्री.प्रसाद पाध्ये (तबला). यांच्या लयदार आणि सुरेल साथीने कार्यक्रमाला अजून रंगत आली. पेक्षकांच्या स्मरणात राहील असा हा "स्मरणगाथा" कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
या कार्यक्रमातील अजून एक महत्वाचा भाग म्हणजे संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत कै. अनंत दामले उर्फ नूतन पेंढारकर यांच्या फोटोचे अनावरण श्री. मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कै. अनंत दामले यांची सुश्ना श्रीमती मृदुला दामले यांचा सत्कार करण्यात आला. रसिकांनी केलेली गर्दी आणि त्यांनी दिलेली उस्फुर्त दाद साहित्य संघाच्या जुन्या आठवणीना उजळा देणारी होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.