पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात पत्नीला तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवर फिरताना पाहिल्यानंतर एका रिक्षाचालकाने त्यांचा पाठलाग केला. मात्र, यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर मारहाण आणि जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात झाले. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने कारवाई करत कथित प्रियकर आणि त्याच्या मामाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू तिमय्या राव उर्फ धोत्रे (वय 51) आणि गणेश अशोक रेड्डी (वय 36) यांचा समावेश आहे. दोघेही बोपोडी परिसरातील रहिवासी असून त्यांना पुढील कारवाईसाठी लोहगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जून रोजी रात्री घडली. फिर्यादी रिक्षाचालक एअरपोर्ट परिसरात प्रवासी सोडल्यानंतर पुढील भाड्याच्या प्रतीक्षेत होते. त्याचवेळी त्यांची पत्नी एका व्यक्तीसोबत बुलेट मोटारसायकलवरून जाताना त्यांच्या नजरेस पडली. संशय आल्याने त्यांनी रिक्षातून त्यांचा पाठलाग केला आणि फॉरेस्ट पार्क रोडवर दुचाकी अडवून पत्नीला जाब विचारला.अटक
यावेळी पत्नीने ती कार्यालयीन कामानिमित्त त्या भागात असल्याचे सांगितले आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती तिला सोडण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही क्षणांतच वाद चिघळला. फिर्यादीच्या आरोपानुसार, गणेश रेड्डी याने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रस्त्यावरील काठीने रिक्षाचालकाच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
याचदरम्यान आरोपीचा मामा राजू धोत्रे घटनास्थळी पोहोचला. त्यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या गोंधळात फिर्यादीच्या पँटच्या खिशातील 18 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
जखमी रिक्षाचालकाने ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर घरी परतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेनंतर पत्नी त्यांच्याकडे परतली नाही आणि कथित प्रियकरासोबत राहू लागली. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी अखेर 8 ऑगस्ट रोजी लोहगाव पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 25 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे युनिट-4 खडकी परिसरात गस्त घालत असताना बातमीदाराकडून दोन्ही आरोपी औंधमधील भक्ती प्लाझा अपार्टमेंट परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना लोहगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.