पुण्यातील लोहगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या रागातून अवघ्या 9 महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार करण्यात आले. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
31 जुलै रोजी घडली घटना
लोहगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, 31 जुलै रोजी कलवड वस्ती येथील एका घरात ही घटना घडली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घरातील वादातून आरोपी महिलेने 9 महिन्यांच्या अली या चिमुकल्याच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आईच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
घटनेनंतर बाळाला उलट्या होऊ लागल्याने आईला संशय आला. त्यानंतर तिने तातडीने बाळाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बाळाच्या तोंडाला जखमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
भावजयीसह तिघांविरोधात गुन्हा
या प्रकरणी आरोपी महिलेसह तिच्या दोन नातेवाईकांविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने तक्रारीत, तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, बाळावर उपचार सुरू असताना काही नातेवाईक रुग्णालयात आले आणि तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
बाळाची प्रकृती स्थिर
या घटनेबाबत माहिती देताना लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले की, चिमुकल्याची प्रकृती आता स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, घटनेमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीचा तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.