राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. दरम्यान, ओबीसींना आरक्षण छगन भुजबळच देऊ शकतील, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात केले आहे. तसेच ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेशमध्ये लागू झालेला निर्णय अंतिम नसून ओबीसींना आरक्षण छगन भुजबळ हेच देऊ शकतील असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भुजबळांचे कौतुक केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी सुरूवातीपासून ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्षणीय काम केलं आहे. त्यामुळे भुजबळ ओबीसींना न्याय देतील, असे त्या म्हणाल्या.
राजकीय लोकांना श्राप देणे हे हास्यास्पद आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अधिकार दिला आहे. त्यामुळे श्राप याबद्दल अंधश्रद्धा नसावी. या सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणल्यामुळे असे बोलणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. माजी मुख्यमंत्री असं बोलून मूळ विषयाला बगल देत असतील तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला काळीमा फासण्याचं काम ते करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ओबीसी नेत्यांची हजेरी लागली असून राष्ट्रवादीचे बडे नेते ओबीसी अधिवेशनाला उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.