भिवंडी : भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ दुकानातून विकल्या गेलेल्या खाद्यपदार्थांमुळे झालेल्या अन्न विषबाधेच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अवघ्या 36 तासांत बाधितांची संख्या तब्बल 107 वर गेल्याने शहरात खळबळ उडाली असून उपजिल्हा रुग्णालयावरील ताणही वाढला आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेची घटना घडून 36 तास उलटल्यानंतर भिवंडीचे प्रथम नागरिक महापौर नारायण चौधरी आणि भाजपा आमदार महेश चौघुले यांनी आज, शनिवारी दुपारी भेट देवून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. परंतु आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट दिली नसल्याने आयुक्त नक्की कुठे गायब झाले, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या कार्यतत्परतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.
सद्यस्थितीत अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 107 वर असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. परंतु दुकानदारांनी पैसे कमावण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी न खेळता अन्नाची गुणवत्ता उत्तम ठेवणे आवश्यक आहे. फेमस शोरमा दुकानाचा परवाना समाप्त झाला असल्यास दुकानावर लवकरच तोडक कारवाई करू. तसेच शहरातील अन्य दुकानदारांनी परवान्याची मुदत संपली असल्यास परवाना काढून घ्यावा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी माहिती भिवंडी महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी दिली.
तर एफडीआय फक्त मोठे हॉटेल, मोठ्या कंपन्यांमध्ये कारवायांचा दिखावा करून स्वतःचे खिशे भरण्यात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. एफडीआयला गोरगरिबांच्या जीवाशी घेण देण नसून फक्त मोठ्या दुकानांवर कारवाई करून खिसे भरण्यासाठी एफडीआय विभाग आहे, असे वाटत आहे. खरी गरज ही छोट्या दुकानांवर कारवाई करण्याची असून याकडे एफडीआयने अशा दुकानांवरील कारवाईकडे लक्ष दिले पाहिजे. फेमस शोरमा दुकानदारावर गुन्हा दाखल झाला असून फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ होऊन आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे, असे भाजप आमदार महेश चौघुले यांची सांगितले.
दरम्यान, भिवंडीत खंडूपाड्यातील फेमस शोरमा दुकानातून झालेल्या 107 रुग्णांच्या विषबाधेनंतर अखेर कारवाई झाली आहे. महापौर नारायण चौधरी यांच्या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने आज दुकानावर तोडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले आहे. भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने 107 जणांना विषबाधा झाली होती. घटनेला 36 तास उलटल्यानंतर महापौर आणि आमदारांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी महापौरांनी दुकानाचा परवाना रद्द करून तोडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दुकानावर बुलडोझर फिरवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.