किरण गोटूर, प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून सोबत राहणाऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने आपल्या नव्या प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट रचल्याची पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तब्बल 18 तास मृतदेह घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर नाशिक – मुंबई महामार्गावरील कसारा घाटात नेऊन मृतदेह फेकून देण्यात आला. नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रियकराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसंत सातपुते हे गेल्या 15 वर्षांपासून हसिना शेख हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, नव्याने झालेल्या साहिल शहा या प्रियकरासोबत प्रेमसंबंधास अडथळा निर्माण होत असल्याने हसिना शेख हिने आपल्या नव्या प्रियकराच्या म्हणजे साहिल शहाच्या मदतीने जुन्या प्रियकराच्या अर्थात वसंत सातपुते यांच्या हत्येचा कट रचत वसंत सातपुते यांची हत्या केल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेटे सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी दिली.
गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास वसंत सातपुते हे घरात झोपलेले असताना त्यांचा गळा चिरून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवण्यात आला. यानंतर 7 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मृतदेह नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात नेऊन फेकून देण्यात आला. दरम्यान, वसंत सातपुते यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने तपास करत कसारा घाटातून वसंत सातपुते यांचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणात प्रेयसी हसिना शेख हिच्यासह साहिल शहा, मोईन शहा आणि आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने नव्या प्रियकरासोबत मिळून हसिना शेख हिने हत्येचा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.