Mangesh Kalokhe Death Case: रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मंगेश काळोखे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी अखेर मोठी कारवाई केली आहे. गेल्या 23 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ता भरत भगत याला खालापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे आता या हत्याकांडातील अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकीय वैमनस्यातून 27 वार
26 डिसेंबर 2025 रोजी खोपोलीत ही धक्कादायक घटना घडली होती. शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडून परतत असताना 5 ते 6 जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला. तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने काळोखे यांच्यावर 27 वार करण्यात आले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या कटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
20 लाखांची सुपारी आणि पराभवाचा बदला
पोलीस तपासात हा कट पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपालिका निवडणुकीत झालेल्या राजकीय पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखे यांचा काटा काढण्यात आला. यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मुख्य मारेकऱ्याने दिलेल्या कबुली जबाबानंतर या कटात राजकीय नेत्यांची नावे समोर आली होती.
सुधाकर घारे अद्याप पोलिसांच्या रडारवर
दरम्यान, भरत भगतला अटक झाली असली तरी, या प्रकरणातील दुसरे मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे अद्याप फरार आहेत. काळोखे कुटुंबाने यापूर्वी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. आरोपींना राजकीय अभय मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य मारेकऱ्यांसह एकूण 12 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भरत भगतच्या चौकशीतून सुधाकर घारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.