Jalgaon: ‘हॅपी रक्षाबंधन ताई… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नकोस’ स्टेटस ठेवून भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच संपवलं जीवन, जळगाव हादरलं

जळगाव शहरातील जुना आसोदा रोड परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
Jalgaon: ‘हॅपी रक्षाबंधन ताई… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नकोस’ स्टेटस ठेवून भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच संपवलं जीवन, जळगाव हादरलं

जळगाव: जळगाव शहरातील जुना आसोदा रोड परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, मृत्यूपूर्वी त्याने सोशल मीडियावर बहिणीसोबतचा फोटो शेअर करत कुटुंबीयांसाठी भावनिक निरोपाचा संदेश पोस्ट केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव रोहित साहेबराव धनगर असे आहे. रोहित हा अकरावीच्या कला शाखेत शिक्षण घेत होता. रक्षाबंधनानिमित्त तो वडिलांसोबत आत्याच्या घरी गेला होता. तेथे बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो घरी परतला. काही वेळाने त्याने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करत “सगळं सांभाळून घे दीदी…” असा भावनिक संदेश लिहिला होता. त्यानंतर मित्रांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हेही वाचा: Jalgaon News : गोळीबाराने डांभुर्णी हादरलं; पोलिसांच्या कारवाईत गावठी पिस्तूल, मॅगझिन, जीवंत काडतूस जप्त

प्राथमिक माहितीनुसार, रोहितने एका मित्राला व्हिडिओ पाठवून ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या दाव्याची पडताळणी करत असून, मोबाईलमधील माहिती आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, त्याने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टेटसही ठेवले होते. त्यामध्ये “अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा…” अशा आशयाचे भावनिक शब्द लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांमध्ये चिंता निर्माण झाली आणि त्यांनी तातडीने त्याच्या घरी धाव घेतली.

कुटुंबीयांनी रोहितला त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे बहिणीसह आई-वडिलांवर मोठा मानसिक आघात झाला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Accident News : रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला! भावाला राखी बांधण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, चिमुकलीचे शीर धडावेगळे; मद्यधुंद चालकाने उद्ध्वस्थ केले कुटुंब

या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सर्व पैलूंनी तपास करत असून, सोशल मीडिया पोस्ट, मोबाईल डेटा आणि संबंधित माहितीची छाननी सुरू आहे. ऑनलाइन गेमिंगशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी कारणमीमांसा स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version