अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर| लग्न जुळत नसल्याने कुंडलीतील दोष दूर करण्याच्या बाहण्याने भोंदू बाबाने आपल्याच घरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला 3 महिन्याची गर्भवती ठेवल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भोंदूबाबा रामेश्वर महाराज रामदासी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लातूर शहरातील मळवटी रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पत्रिकेत कुंडली दोष असल्याने तिचे लग्न जुळत नसल्याचे भोंदूबाबाने मुलीच्या पालकांना सांगून पूजा घालण्याचा बनाव रचला आणि दोष निवारण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शिवाय कोणालाही सांगितल्यास कुंडलीतील दोष दूर होणार नाही अशी भीती घालून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन पीडित तरुणी 3 महिन्यांची गर्भवती राहिली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम कायद्यान्वये कथित भोंदूबाबा रामेश्वर महाराज रामदासी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. आरोपी भोंदू बाबा विवाहित असून तो केवळ दहावी पास आहे.
पूजा आर्चा करून कुंडली पाहण्याचे व दोष दूर करण्याचे दावे तो करतो. पीडित मुलीचे आई वडील मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. त्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत भोंदू बाबांनी त्यांच्याकडून पैसेही उकळले असून भोंदूबाबाला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले आहे.