सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका पिटबुल कुत्र्याने एका जोडप्यावर जीवघेणा हल्ला केला. पटियालातील घुम्मन नगरमध्ये मंगळवारी एका प्रॉपर्टी डीलरच्या सांगण्यावरून नवीन घर पाहण्यासाठी पोहोचलेल्या अंकित आणि त्यांची पत्नी शिफाली यांच्यासोबत एक भयंकर प्रकार घडला. घरासमोर असलेला गेट उघडताच काहीच क्षणांत आत बसलेल्या पिटबुलने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. ज्यात ते दोघेही जखमी झाले.
यावेळी जोडप्याचा आरडाओरडा, आक्रोश ऐकून एक महिला घरातून काठी घेऊन आली आणि कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा मागे हटण्याऐवजी आणखी आक्रमक झाला. यानंतर आसपासचे दोन-तीन जण काठ्या घेऊन तिथे आले आणि जखमी झालेल्या दाम्पत्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. पिटबुल कुत्रा दाम्पत्यावर अचानक तुटून पडताना दिसतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान यावेळी या संपूर्ण अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाची आपबिती अंकित सभरवाल यांनी सांगितली आहे. आम्ही फक्त भाड्याचं घर पाहण्यासाठी गेलो होतो. पण घरासमोर असलेला गेट उघडताच आत बसलेल्या पिटबुल कुत्र्यानं आमच्यावर हल्ला केला. असं म्हणत भयंकर प्रकार सांगितला. अंकित सभरवाल यांनी सांगितलं की, "मी माझ्या पत्नीसह प्रॉपर्टी डीलरसोबत भाड्याचं घर पाहण्यासाठी संध्याकाळी घुम्मन नगरला गेलो होतो. आम्ही घरासमोरील मुख्य गेट उघडताच आत असलेल्या पिटबुल कुत्र्यानं आमच्यावर जीवघेणा हल्ला केला. कुत्र्यानं सर्वात आधी माझ्या पत्नीवर हल्ला केला. तिच्या शरीराच्या अनेक भागांवर अत्यंत वाईट रीतीने ओरबाडण्यास सुरुवात केली. तिच्या तिच्या दोन्ही हातांना आणि मांड्यांवर पिटबुलनं चावा घेत गंभीर दुखापत केली. ती अजूनही ICU मध्ये आहे. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागली."
"पिटबुलनं हल्ला करताच पत्नी खाली पडली. मी माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी कुत्र्याशी दोन हात केले. तेव्हा कुत्र्यानं माझ्यावर हल्ला करत पायावर, पाठीवर आणि संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा केल्या. त्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी टाके घालावे लागले. तो कुत्रा इतका हिंसक होता की, त्याचा मालक ओरडत होता, त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता, तरी तो थांबला नाही. जर आजूबाजूचे लोक लाठ्याकाठ्या घेऊन मदतीला धावून आले नसते, तर त्याने आम्हाला जिवंत सोडलं नसतं. आम्हाला फक्त आणि फक्त कठोर कायदेशीर कारवाई आणि न्याय हवा आहे." असा प्रसंगावतान अंकित यांनी सांगितला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.