विक्रोळी : विक्रोळी (पश्चिम) येथील राहुल नगरमध्ये 6 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेली सुनील विश्वकर्मा (40) आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं
प्राथमिक माहितीनुसार, राहुल नगर येथे वास्तव्याला असणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. यापैकी दोघेजण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. यापैकी सुनील विश्वकर्मा (वय 40) यांनी घरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरुन त्यांचे दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. यावरुन सुनील विश्वकर्मा आणि दोन भावांची शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाचाबाची इतकी टोकाला गेली की या सगळ्यांची हाणामारी सुरु झाली. त्यावेळी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याने जीव सोडला. सुनील विश्वकर्मा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.