नवी दिल्ली : एका टॅक्सी चालकाने 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्ली येथे घडली असून तिचा मृतदेह दिल्लीतील मेहरौली भागातील एका जंगलमय परिसरात सापडला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास मुलीच्या कुटुंबीयांनी पीसीआर (PCR) कॉलद्वारे पोलिसांना आपली मुलगी बेपत्ता झाल्याची सूचना दिली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मेहरौली पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. तपासादरम्यान, पोलिसांना एका संशयास्पद टॅक्सी चालकाबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली. त्याची ओळख 25 वर्षीय बबलू अशी पटली असून, तो ॲप-आधारित कॅब चालवतो. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, त्याने मेहरौली भागातील सीडीआर (CDR) चौकाजवळील फुटपाथवरून त्या मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तो तिला गुरुग्रामच्या दिशेने घेऊन गेला. जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून आरोपीवर शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल. मूळचे बिहारचे असलेले पीडितेचे कुटुंब पूर्वी एका भाड्याच्या घरात राहत होते. परंतु ते घर गमवावे लागल्यामुळे ते फुटपाथवर राहू लागले. ती मुलगी फुगे विकायची आणि तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. या 10 वर्षांच्या मुलीसह त्या पालकांना एकूण चार मुले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.