रायपूर: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रंगत आलेली असून, पहिला सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताने पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला होता. आज, 3 नोव्हेंबर, दोन्ही संघ रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
रायपूरच्या या स्टेडियमची एकदिवसीय सामन्यांची परंपरा मोठी नसली तरी येथे झालेला एकच सामना भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहिलेला आहे. जानेवारी 2023 मध्ये येथे भारताने न्यूझीलंडचा 108 धावांत बंदोबस्त केला होता. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या वेगवान गोलंदाजीने त्या वेळी न्यूझीलंडची वाट लावली होती. या मैदानावर विकेट बहुधा जलदगती गोलंदाजांना अनुकूल असते, त्यामुळे आजही चेंडूला चांगली गती आणि उंच उसळी मिळण्याची शक्यता आहे. मोठे चौकार असल्याने षटकार मारणे सोपे नसणार, परंतु आउटफिल्डमुळे चौकारांची बरसात दिसू शकते.
पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी संघात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऋतुराज गायकवाडला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आले होते, मात्र त्याची खेळी अपेक्षेप्रमाणे जमली नाही. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळण्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे वॉशिंग्टन सुंदरलाही फलंदाजीत आणि गोलंदाजीत पाहिजे तेवढा प्रभाव पाडता आला नाही. दुसरीकडे कुलदीप यादवने चार महत्वाच्या विकेट्स घेत आपला ठसा उमटवला. वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग आजच्या सामन्यातही खेळतील असे संकेत आहेत. हे तिन्ही खेळाडू चांगल्या लयीत दिसत आहेत आणि रायपूरच्या परिस्थितीत त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो.
भारताचा कर्णधार केएल राहुल संघाच्या संतुलनाकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आज मालिकेत परतण्याच्या प्रयत्नात असेल. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखालील संघात क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन आणि केशव महाराज यांसारखे तरुण आणि प्रभावी खेळाडूही आफ्रिकेला मोठी ताकद देतात. पहिल्या सामन्यात त्यांची मधली फळी कोसळली होती, त्यामुळे आज ते अधिक सावध आणि निर्धाराने उतरतील.
भारताची संभाव्य संघ: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी जिओर्गी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि ओटनील बार्टमन
चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारत मालिकेत आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका मालिकेत पुनरागमन करण्यासाठी झुंज देईल. रायपूरमध्ये आज महत्वाची आणि चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
हेही वाचा: Stock Market Update: शेअर बाजारात मोठी उलथापालथ! Sensex 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.