राज्यात थकीत वीजबिल रक्कमेमुळे भविष्यात वीज निर्मितीमध्ये अडचण येऊ शकते, असे संकेत ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, सक्तीची वसुली केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण बुलडाण्यातील शासकीय यंत्रणांनीच ३४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात शासकीय यंत्रणांनी वापरलेल्या वीज बिलाचा आकडा शेकडो कोटींच्या घरात पोहचला आहे. बुलडाण्यात शासकीय यंत्रणांनी तब्बल ३४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकवले असल्याची माहिती वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय : २ लाख
पोलीस विभाग : १ कोटी ८९ लाख
जिल्हा परिषद : १ कोटी
वाटर सप्लाय : ७५ कोटी
जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत येणारे स्ट्रीट लाईट २५४ कोटी
राज्यात वीजबिल भरण्याच्या मुद्द्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपत पाहायला मिळत आहे. एकीकडे वीज वितरण कंपनी सर्वसामान्यांकडून वीजबिल वसुली करत आहे. तर दुसरीकडे, वीजबिल न भरल्यामुळे ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात येत आहे. दरम्यान, वीजबिल थकवणाऱ्या सरकारी अधिष्ठानांवर वीज वितरण कंपनीतील कर्मचारी आपली मेहरबानी दाखवत असल्यामुळे दु:ख व्यक्त केलं जात आहे. घरगुती ग्राहकांना एक न्याय व शासकीय अधिष्ठानांना दुसरा न्याय, अशाप्रकारे वीज वितरण कंपनी थकीत वीज ग्राहकांमध्ये भेद करत असल्याचे चित्र दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.