NCP: ‘वर्षा’वरील बैठकीची सुनेत्रा-पार्थ पवारांनाही नव्हती कल्पना? देवगिरी बैठकीत मोठा खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती, असा दावा सूत्रांनी केला आहे. देवगिरी बैठकीत या भेटीबाबत चर्चा झाल्याने राजकीय
NCP: ‘वर्षा’वरील बैठकीची सुनेत्रा-पार्थ पवारांनाही नव्हती कल्पना? देवगिरी बैठकीत मोठा खुलासा

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, या बैठकीबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीची पूर्वकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनाही नव्हती.

या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. बैठकीदरम्यान 'वर्षा' येथे झालेल्या चर्चेचा विषय उपस्थित करण्यात आल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत सविस्तर माहिती विचारली. त्यावर तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडून ही बैठक बोलावण्यात आल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या भूमिकेचा कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे तटकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना चर्चेसाठी 'वर्षा'वर बोलावले होते का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भेटीमागील नेमके कारण आणि त्यातून पुढे कोणते राजकीय संकेत मिळणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनंतर या बैठकीला आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version