Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीसाठी समन्स बजावूनही तब्बल 24 तास उलटून गेले तरी चाकणकर चौकशीसाठी हजर न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणात शिवनिका संस्थेच्या आजी-माजी विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र चाकणकर यांच्या अनुपस्थितीमुळे तपासाचा फोकस आता इतर पुराव्यांकडे वळवण्यात आला आहे. विशेषतः अशोक खरातच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यावर भर दिला जात आहे.
तपास यंत्रणा सध्या कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी करत आहे. मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, या तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर SITने चौकशीचा अँगल बदलत तांत्रिक पुराव्यांवर अधिक भर दिल्याचे समजते.
चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणताही लाभ झाला होता का, याचाही तपास केला जात आहे. या मुद्द्यावरूनच त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
चाकणकर चौकशीसाठी केव्हा हजर होणार, याबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे त्या SITसमोर उपस्थित राहतील का, की या प्रकरणात आणखी काही घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास अधिकच वेगाने पुढे सरकत असून, चाकणकरांच्या गैरहजेरीमुळे या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.