‘मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरणार असेल, तर प्रगती नको’ राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

'मराठी माणसाच्या अस्तित्वावर जर वरवंटा फिरणार असेल, तर आम्हाला अशा प्रगतीची गरज नाही,' अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.
‘मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरणार असेल, तर प्रगती नको’ राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

मुंबई: 'मराठी माणसाच्या अस्तित्वावर जर वरवंटा फिरणार असेल, तर आम्हाला अशा प्रगतीची गरज नाही,' अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शासन, शिक्षण व्यवस्था आणि मराठी अस्मितेवर थेट आणि परखड भाष्य केलं. सोशल मीडियावर या मुलाखतीचा टिझर व्हायरल होत आहे, आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, 'सत्ताधारी पक्षांनी मराठी भाषेच्या प्रश्नाकडे राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाहण्याची गरज आहे.' भाषेचा सन्मान फक्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करून होत नाही, तर तो प्रत्यक्षात शिक्षण, प्रशासन आणि समाजात मराठी भाषेला अग्रस्थान देऊन दिसावा लागतो. भाषा ही केवळ अभिव्यक्तीचं साधन नसून ती संस्कृती, ओळख आणि अस्मिता आहे, असं ते म्हणाले.

'आज राज्यात विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत, फ्लायओव्हर, ब्रिजेस  हे चांगलं आहे, पण या विकासामध्ये जर मराठी माणूसच बाजूला पडणार असेल, तर ती प्रगती नको,' असं राज ठाकरे म्हणाले. त्यांनी मराठी माणसाच्या भूमिकेचा आग्रह धरत विकासाच्या नावावर मूळ संस्कृतीचा बळी देण्याचा विरोध केला. 'मराठीपणाचं अस्तित्व संपत असेल, तर ते विकास नव्हे, तो विनाश आहे,' अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण व्यवस्थेतील बदलांवरही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. काही शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही, ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचं ते म्हणाले. 'फ्रेंच क्रांती शिकवता, पण शिवाजी महाराजांचं क्रांतिकारक योगदान नाही का शिकवता येत? क्रांतीचा उगम आपल्याच भूमीत झाला, हे विद्यार्थ्यांना कळायला हवं,' असं ते म्हणाले. त्यांनी शाळा व्यवस्थेवरही टीका करत, आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू झाल्याने स्थानिक इतिहास बाजूला पडल्याचं स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातही आवाज उठवला. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा निषेध करत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, 'ही सक्ती आम्ही खपवून घेणार नाही.' केंद्र सरकार राज्यावर हिंदीकरण लादू पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version