Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती अधिकृत होणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, ही घोषणा 24 डिसेंबर रोजी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या तारखेची निवड केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहे की त्यामागे काही वेगळं गणित आहे, यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर दिली. राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर करत “उद्या 12 वाजता” अशी सूचक पोस्ट करण्यात आली. मात्र या घोषणेसाठी निवडलेली तारीख लक्षवेधी ठरत आहे.
राज ठाकरे आणि ‘९’ या अंकाचं नातं नवीन नाही. राज ठाकरे हे अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात, असं त्यांच्या जवळच्या अनेक घटनांमधून दिसून आलं आहे. 24 डिसेंबर 2025 या तारखेची अंकशास्त्रीय मांडणी केली तर 2+4+1+2 = 9 असा आकडा समोर येतो. तसेच 2025 या वर्षातील आकड्यांची बेरीज केली तरी अंतिम उत्तर 9च येतं. त्यामुळेच युतीची घोषणा मुद्दाम याच दिवशी करण्यात आली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासात 9 या अंकाशी संबंधित अनेक महत्त्वाचे टप्पे दिसतात. शिवसेनेतून बाहेर पडण्याची घोषणा, पहिल्या सभा, पक्षाची स्थापना, प्रचाराच्या सुरुवातीच्या तारखा या सगळ्यांमध्ये 9, 18 किंवा 27 सारख्या तारखांचा उल्लेख वारंवार आढळतो. मनसेची स्थापना देखील 9 मार्च रोजी करण्यात आली होती, हे विशेष.
केवळ राजकीयच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही राज ठाकरे या अंकाला महत्त्व देताना दिसतात. त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचे कार्यक्रम, वेळा आणि तारखा यामध्येही 9 चं गणित अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठीही हा ‘लकी नंबर’ विचारात घेतला गेला असावा, अशी चर्चा आहे.
दरम्यान, ही युती मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे. अंकशास्त्र, रणनीती आणि राजकीय गणित यांचा हा योग यशस्वी ठरणार का, हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी ‘९’ या अंकामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.