मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटनात्मक पातळीवर व्यापक आणि दूरगामी फेरबदल केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटनेत मोठी फेररचना करत विविध राज्यांच्या प्रभारी व सहप्रभारींच्या नवीन नियुक्त्या बुधवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. या नव्या रचनेमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख चार नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने मोठा विश्वास दाखवला आहे. ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे देशातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे, तर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय डॉ. भारती पवार यांची गोव्याच्या प्रभारीपदी आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी वर्णी लागली आहे.
स्मृती इराणी आणि राम माधव यांच्यावरही मोठी जबाबदारी
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या भाजप प्रभारीपदाची धुरा राज्यसभा खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील इतर महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये स्मृती इराणी यांच्यावर छत्तीसगढ आणि हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर राम माधव हे उत्तराखंड व तमिळनाडूचे प्रभारी असतील. याशिवाय तरुण चुग यांच्याकडे गुजरात, हरीश द्विवेदी यांच्याकडे कर्नाटक व बिहार आणि श्रीकांत शर्मा यांच्याकडे हिमाचल प्रदेशचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा व्यापक खांदेपालट करण्यात आला आहे.
तरुण अन् अनुभवी नेतृत्वाचा मेळ
नितीन नवीन यांनी पक्षाध्यक्षपदाची कमान हाती घेतल्यापासून भाजप संघटनेत सातत्याने नवे आणि तरुण चेहरे पुढे आणले जात आहेत. राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये तावडे आणि कुलकर्णी यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वजनात अधिक वाढ झाली आहे. पक्षाने विविध राज्यांचे भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय समीकरण लक्षात घेऊन ही नवी सूची तयार केली आहे. देशभरातील सर्व घटक राज्यांमध्ये पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी आणि संघटनात्मक काम जलद गतीने पुढे नेण्यासाठी ही नवी कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.