Rare Wildlife Moment: कधी कधी निसर्ग असे काही क्षण समोर आणतो, जे मानवी डोळ्यांनी पाहणंही अविश्वसनीय वाटतं. कर्नाटकातील भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये असाच एक थक्क करणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जंगलातील दोन बलाढ्य शिकारी काळा बिबट्या आणि बिबट्या एकाच वेळी शांतपणे पाणी पिताना दिसल्याने वन्यजीवनप्रेमी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत.
या दुर्मिळ दृश्याचा व्हिडिओ प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सोहन सिंग यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हिडिओमध्ये आधी बिबट्या निवांतपणे पाणी पिताना दिसतो. काही क्षणांतच मागून काळा बिबट्या हळूच पुढे येतो आणि कोणतीही आक्रमकता न दाखवता त्याच्या शेजारी उभा राहून पाणी पितो. पाण्यात उमटणारी दोघांची प्रतिबिंबं हा क्षण अधिकच अविस्मरणीय करतात.
हा व्हिडिओ शेअर होताच काही तासांतच व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा क्षण “आयुष्यात एकदाच पाहायला मिळणारा” असल्याचं म्हटलं आहे. काही वापरकर्त्यांनी इतकं सुंदर दृश्य पाहून ते कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलं असावं अशी शंका व्यक्त केली, मात्र अनेक जाणकारांनी हे दृश्य पूर्णपणे नैसर्गिक असल्याचं स्पष्ट केलं.
सोहन सिंग यांनी व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये हा क्षण अत्यंत खास असल्याचं नमूद केलं. भद्रा जलाशयाच्या शांत परिसरात घडलेला हा प्रसंग अनेक वर्षे लक्षात राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. वन्यजीवनात अशा प्रकारे दोन शिकारी प्राणी शांतपणे एकत्र दिसणं फारच दुर्मिळ मानलं जातं.
कर्नाटक मधील हा व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाट पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. घनदाट जंगल, टेकड्या, दऱ्या आणि नद्यांनी समृद्ध असलेला हा परिसर अनेक दुर्मिळ वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. येथे वाघांची संख्या स्थिर असून बिबट्या, काळा बिबट्या, हत्ती, अस्वल यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, काळा बिबट्या हा प्रत्यक्षात बिबट्याचाच एक प्रकार असून त्याच्या शरीरातील मेलॅनिझम या गुणधर्मामुळे त्याचा रंग काळा दिसतो. त्यामुळे हे दोन्ही प्राणी एकाच परिसरात असणं शक्य असलं, तरी अशा प्रकारे एकत्र पाणी पिताना दिसणं फारच क्वचित घडतं.
या व्हिडिओमुळे भद्रा व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून, भारतातील जंगलांमध्ये दडलेली अद्भुत रहस्ये आजही किती जिवंत आहेत याची जाणीव या दृश्याने करून दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.