मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांनी नुकतेच अर्ज दाखल केले असून यामध्ये नेतेमंडळींनी आपल्या नातलगांना मोठ्या प्रमाणात तिकीट दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने घराणेशाहीचा आरोप भाजपवर होत आहे. यावर भाजप, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले असून घराणेशाहीचा आरोप खोडून काढला आहे.
काय म्हणाले अमित साटम
भाजपात बंडखोरी नाही, पूर्ण यादी तपासली तर उबाठा आणि मनसेत उलट बेबनाव आहे. मनसेचा उमेदवार आहे, तिथे उबाठाची बंडखोरी आहे. उबाठाला उमेदवारी मिळाल्याने मनसेनं बंडखोरी केली आहे. उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. दोन मामूंना उद्धव ठाकरेंनी रेड कार्पेट घेत प्रवेश दिला. उबाठात मोठा असंतोष दिसून येत आहे. भगव्याकडून हिरव्याकडे प्रवास होत आहे. ज्या ठिकाणी 2-4 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले ते पुन्हा 2 तारखेला भाजपात असतील. विचार हिंदुत्व समाज यासाठी भाजप कार्यकर्ता काम करतो. अनेकांचे स्वप्न आकांक्षा असतात. मात्र मोठा विचार करत भगवा झेंडा फडकला पाहिजे. मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. यासाठी भाजपचा कार्यकर्ता समोर येईल. उद्या बंडखोर अधिकृत उमेदवारांना प्रचार करताना दिसतील. भाजपात उमेदवारी देण्याची प्रक्रिया असते, कोअर कमिटीमध्ये चर्चा होते. पक्षाने सर्व्हे केले होते. याचा विचार करत संघटनात्मक बांधणीच्या आधारावर नावं देण्यात आली आहेत. चार स्टेप पार करत उमेदवारी दिल्या गेल्या आहेत. पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीनं प्रक्रिया राबवली आहे आणि उमेदवारी दिली आहे. मकरंद नार्वेकर यांनी २०१७ साली पक्षप्रवेश केला. हर्षिता त्यांच्या आधीपासून नगरसेविका आहेत. राहुल नार्वेकर यांच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. संबंध आहेत म्हणून दिली नाही, त्यांच्या कामावरून उमेदवारी दिली आहे, असे अमित साटम म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.