दीड, पाच दिवसांचे, गौरी गणपती विसर्जनानंतर आता राज्यासह देशभरात अनंत चतुर्दशीच्या गणपतीच्या विसर्जनाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. दरम्यान गणपती विसर्जनानंतर अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून येतात, अथवा काही मूर्ती पाण्यावर तरंगतात.
यावेळी काही जण अशा मूर्तीचे फोटो काढून ते प्रकाशित किंवा प्रसारित करतात. मात्र आता विसर्जनानंतर अर्धवट मूर्तीचे फोटो काढणे महागात पडणार आहे. गणेश विसर्जनानंतर अर्धवट अथवा तरंगणाऱ्या मूर्तींचे फोटो काढून प्रसारित करू नयेत असा थेट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अशा प्रकारचा कोणताही फोटो व्हिडिओ काढून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर पोलिसांची कायदेशीर कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे फोटो, व्हिडिओ प्रसारित करून धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 299 अन्वये या अंतर्गत कारवाई होणार असून मुंबई पोलिसांकडून 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान विशेष आदेश लागू करण्यात आले आहेत. धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ अथवा शांतता भंग होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याची विशेष खबरदारी घेतली आहे.