मुंबई : महाराष्ट्र भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात मोठी झेप घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत RPPL आणि NMMC यांच्यात सामंजस्य करार झाला असून, डिसेंबर 2025 मध्ये इंडियन रेसिंग फेस्टिव्हल (IRF) चा अंतिम टप्पा नवी मुंबईत आयोजित होणार आहे. यामुळे मुंबईच्या पहिल्या FIA-ग्रेड स्ट्रीट रेसिंग सर्किट ला हिरवा कंदील मिळाला आहे.
या वेळी प्रथमच नवी मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या प्रकाशात आंतरराष्ट्रीय दर्जाची रेस पार पडेल. सुमारे 3.753 किमी लांबीचे आणि 14 वळणांनी सजलेले हे सर्किट भारतातील मोटरस्पोर्ट्ससाठी नवा मापदंड ठरणार आहे.
स्पर्धेत भारतीय व आंतरराष्ट्रीय रेसर्स सहभागी होणार असून, प्रेक्षकांना थरारक नाइटटाइम डबल-हेडर वीकेंड अनुभवायला मिळेल. यात इंडियन रेसिंग लीग (IRL) आणि फॉर्म्युला-4 इंडियन चॅम्पियनशिप (F4IC) या प्रमुख मालिका सामील असतील. रेसचा मार्ग पाम बीच रोड पासून सुरू होऊन नेरुळ तलाव परिसरातून जाणार आहे.
या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नवी मुंबईत इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचे आयोजन हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या रेसमुळे राज्याच्या पर्यटन, रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा मिळेल.”
हैदराबाद, चेन्नई, कोयंबतूर आणि गोवा येथे फेऱ्या झाल्यानंतर आता मुंबई कॅलेंडरमध्ये सामील झाली आहे. त्यामुळे भारतात शाश्वत आणि जागतिक स्तरावरील मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टीम उभारण्यासाठी हा निर्णायक टप्पा ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.