घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या करोडो ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने एलपीजी सबसिडीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, यापुढे सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण नसेल, त्यांना सबसिडीच्या दरात गॅस सिलेंडर मिळणार नाही.
तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांपैकी सुमारे 27.43 कोटी म्हणजेच 89.9 टक्के ग्राहकांनी आपले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आधीच पूर्ण केले आहे. या ग्राहकांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, त्यांचे गॅस बुकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
मात्र अजूनही सुमारे 10 टक्के ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा ग्राहकांनी 30 सप्टेंबर 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
बायोमेट्रिक प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
ग्राहकांच्या सोयीसाठी सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जसे
1. गॅस सिलेंडर घरी डिलिव्हरीला आल्यावर डिलिव्हरी बॉयच्या मोबाईल अॅपद्वारे तुम्ही लगेचच बायोमेट्रिक करू शकता.
2. तुम्ही थेट तुमच्या गॅस एजन्सीच्या शोरूममध्ये जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
3. घरबसल्या मोबाईलवरूनही हे काम होणार आहे. इंडियन ऑइलच्या ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारत गॅससाठी HelloBPCL आणि एचपी गॅसच्या ग्राहकांसाठी HP PAY अॅपवर ही सुविधा उपलब्ध आहे.
प्रक्रिया नाही केली तर काय होईल?
जर तुम्हाला बायोमेट्रिक करायचे नसेल किंवा काही कारणाने तुम्ही करू शकत नसाल, तरीही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणे बंद होणार नाही. मात्र तुम्हाला सबसिडीशिवाय बाजारभावाने सिलेंडर विकत घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या अॅप, WhatsApp, IVRS वर जाऊन सबसिडी नको असल्याची पसंती नोंदवावी लागेल.
सरकारने या मोहिमेसाठी ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 12 कोटींहून अधिक SMS आणि WhatsApp मेसेज पाठवले आहेत. सुरुवातीला या कामाची अंतिम मुदत 30 जून 2026 होती, पण ग्राहकांच्या सोयीसाठी ती वाढवून 14 सप्टेंबर आणि आता 30 सप्टेंबर 2026 करण्यात आली आहे.
त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर आपले आधार बायोमेट्रिक अपडेट करून घ्या. अधिक माहितीसाठी 1800 2333 555 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.