भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास अचानक एका इमारतीचा मोठा भाग कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भिवंडीतील भंडारी कंपाऊंड स्थित गंगाराम वाडी परिसरात कोहिनूर अपार्टमेंट गंगाराम वाडी नारपोली येथील तळ अधिक चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला.
ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 4 ते 5 नागरिक दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले जात होते.
दरम्यान इमारतीचा पिलर धोकादायक झाल्याने तेथे दुरुस्तीचे काम रात्री सुद्धा सुरू होते. रात्री आठ वाजता इमारत एका बाजूने झुकत आल्याचे लक्षात आल्याने सर्व कुटुंबांना स्थानिकांनी बाहेर काढले होते. तरी सुद्धा काही नागरिक इमारती मध्ये गेले होते तर काम करणारे मजूर अडकल्याची माहिती समोर आली. बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या दुर्घटनेत नक्की किती लोक जखमी झाले आहेत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर थोड्याच वेळात मंत्री गिरीश महाजन मुंबईतून भिवंडीकडे रवाना होणार असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन देणार दुर्घटना स्थळी भेट देणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवरील उपचाराची माहिती घेणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.