छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात बुधवारी रात्री एक असा अपघात घडला, ज्यात केवळ वाहतूक विस्कळीत झाली नाही, तर मानवी संवेदनशीलतेलाही मोठा धक्का बसला. बियरच्या बॉक्सने भरलेला एक कंटेनर रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर अचानक उलटला आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ माजला. कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकलेला असून मदतीसाठी ओरडत होता, पण जमलेल्यापैकी कोणीही त्याला मदत केली नाही. अपघातात जखमी झालेल्या चालकाचं नाव सय्यद अब्दुल्ला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बियर उत्पादक कंपनीचा कंटेनर सुमारे दोन हजार बियर बॉटल बॉक्स घेऊन जळगावकडे जात होता. वाहन धनुष्यबाण कमानीजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमधून डिझेल रस्त्यावर सांडले होते आणि रस्त्यावर बियरच्या बॉक्सचा ढीग पसरला.
अपघात पाहताच मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. या जमावाने मात्र या ठिकाणी वेगळीच गोष्ट केली. केबिनमध्ये अडकलेला चालक जीवाच्या आकांताने बाहेर काढण्याची विनवणी करत असताना, अनेक जण त्या विनवणीपासून दूर राहून रस्त्यावर पडलेल्या बियरच्या बॉक्सवर तुटून पडले. चालकाला मदत करण्याऐवजी बियर घेऊन पळणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि काही क्षणांत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसू लागले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. जमावावर नियंत्रण मिळवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. अखेर अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून लुटमारीत गुंतलेल्या जमावाला मागे हटवले. नंतर पोलिसांनी परिसराला वेढा घालून रस्त्यावर पडलेले बियर बॉक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने इतर वाहनांतून हटवले. यानंतर कंटेनरचे अवशेष बाजूला करून चालकाला बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
पोलिस आणि अग्निशामक दलाने मिळून केलेल्या प्रयत्नांनंतर अब्दुल्ला यांना अखेर सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वाळूज पोलीस पुढील तपास करत आहेत. या संपूर्ण घटनेने अपघाताच्या ठिकाणी मानवतेपेक्षा लोभ कसा पुढे येतो, याचे अत्यंत धक्कादायक चित्र समोर आणले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.