त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावतीत हिंसक वळण; नांदेड, मालेगावात परिस्थिती पूर्वपदावर

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावतीत हिंसक वळण; नांदेड, मालेगावात परिस्थिती पूर्वपदावर

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे.

 अमरावतीमध्ये भाजपच्या बंदला हिंसक वळण लागले. तर बंददरम्यान अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून वार्तांकनादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये जातीय तणाव चिघळला असून शिवसेनासुद्धा या बंदमध्ये सहभागी झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्रिपुरा हिंसाचार घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावतीमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली असून पोलिसांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी दुकानासह ४ गाड्या पेटवल्या. या दरम्यान आंदोलकांची गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला.

मालेगावातली परिस्थिती नियंत्रणात

  त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद मालेगावातही मोठ्या प्रमाणात उमटले आहे. त्यामुळे आंदोलकांच्या हिंसाचारानंतर मालेगावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. मालेगावातील आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच हिंसाचार, दगडफेक करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.

हिंसाचारानंतर नांदेडमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

  नांदेडमध्येही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी नांदेड शहरातील शिवजी नगर आणि देगलूर नाका भागात दगडफेक झाली होती. यात खासगी वाहनांची तोडफोड झाली तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यामुळे या हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हाप्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version